अहमदनगर : कोरोनावरील लस गुरुवारी सायंकाळपर्यंत उपलब्ध झाली नाही. त्यामुळे महापालिकेच्या सातही आराेग्य केंद्रांवर सुरू असलेली लसीकरण मोहीम शुक्रवारी दिवसभर ठप्प होती. दरम्यान, लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परत जावे लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.
महापालिकेला जिल्हा परिषदेकडून लस उपलब्ध करून दिली जात आहे. जिल्हा परिषदेकडून नगर शहरासाठी महापालिकेला बुधवारी सायंकाळी कोविशिल्डचे १,०००, तर कोव्हॅक्सिनचे १,५०० डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. हे डोस महापालिकेच्या तोफखाना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून वितरित करण्यात आले. महापालिकेच्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रांसह आयुर्वेद महाविद्यालयातील केंद्रात नागरिकांना लस दिली गेली. प्रत्येकी १०० डोस सर्व केंद्रांना देण्यात आले होते. हे डोस गुरुवारी दुपारी संपले. शुक्रवारसाठी लसीची मागणी महापालिकेकडून केली गेली; परंतु लस अद्याप आली नसल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळपर्यंत लस उपलब्ध न झाल्याने महापालिकेच्या सातही केंद्रांतील लसीकरण मोहीम दिवसभर बंद होती. लस घेण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या विविध केंद्रांवर गर्दी केली होती; परंतु लस उपलब्ध नसल्याने त्यांना लस न घेता माघारी फिरावे लागले.
कोरोनावरील लसीकरण मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे. लस घेण्यासाठी नागरिक केंद्राबाहेर रांगा लावताना दिसतात; परंतु एका केंद्रावर १०० डोस उपलब्ध असतात. हे डोस दुपारी १२ वाजेपर्यंत संपतात. त्यामुळे नागरिक सकाळपासूनच केंद्रावर दाखल होतात; परंतु लसीअभावी मोहीम थांबवावी लागत असून, नागरिक संताप व्यक्त करत आहेत. शहरासाठीचा लसीकरणाचा पुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
....
४२ हजार नागरिकांनी घेतली लस
महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून शहरातील ४५ हजार ३२५ नागिरकांनी लस घेतली आहे. नगर शहराची लोकसंख्या पाहता हे लस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. मात्र, लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहीमच थंडावल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.