योगेश गुंड अहमदनगरतीव्र पाणी टंचाई, जनावरांची चारा-पाण्यावाचून चाललेली तडफड... एकूणच नगर तालुक्यातील दुष्काळस्थितीने बालगोपाळांची आवडती उन्हाळ्याची अर्धी सुट्टी आधी पाण्याच्या भटकंतीनंतर टँकरची वाट पाहण्यात गेली. तालुक्यात ८ छावण्या सुरु झाल्याने शाळकरी मुलांची ड्युटी आता छावणीमधील जनावरांच्या संगोपनात जात आहे. तालुक्यात जवळपास ५०० विद्यार्थी छावणीत सुट्टीचा आनंद घेत असल्याचे दिसून आले. दुष्काळामुळे शहरी मुलांसारखी पीकनिक, गेम खेळणे, कार्टून पाहणे, समर कॅम्प यांसारख्या गोष्टी सोडून खेड्यातील मुले छावणीत मुक्काम ठोकून मुक्या जिवांच्या संगोपनात व्यस्त असल्याचे दिसून आले. सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या सुट्टीची धूम सुरु आहे. मात्र, ग्रामीण भागात प्रचंड पाणी आणि चारा टंचाई यामुळे खेड्यातील मुलांच्या नशिबी या सुट्टीचा आनंद लुटणे निसर्गाने हिरावून घेतले आहे. तालुक्यात ५६ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो. त्याची वेळ निश्चित नसते. या टँकरची वाट पाहणे, पायपीट करून पाणी आणणे, अशा कामात या मुलांची अर्धी सुट्टी गेली. आता नगर तालुक्यात वाळकी, रुईछत्तीसी, कौडगाव, जेऊर, बुऱ्हाणनगर, चास, दहिगाव, नेप्ती येथे जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमधून जवळपास पाच हजार जनावरे दाखल आहेत. या जनावरांसोबत राहणे, त्यांना वेळेवर चारा- पाणी देणे, या कामांसाठी शाळकरी मुलांची ड्युटी लागली आहे. ही मुले दुष्काळामुळे कुटुंबावर आलेल्या संकटाची जाणीव ठेवत इमानेइतबारे आपल्या मुक्या जनावरांचे मायेने संगोपन करण्यात गुंतली आहेत. यासाठी सध्या त्यांचा मुक्काम छावणीतच सुरु आहे. तेथेच त्यांची उन्हाळ्याची सुट्टी आनंद मानून सुरु आहे.तालुक्यातील छावणीमध्ये फेरफटका मारला असता, जवळपास ५०० च्या आसपास मुले छावणीमध्ये जनावरांची काळजी घेताना दिसून आली. ही सर्व मुले छावणीत मुक्काम करून आपली सुट्टी जनावरांसोबत घालवत आहेत. शहरी मुलांसारखी सुट्टीतील मौजमस्ती निसर्गाच्या अवकृपेने या खेड्यातील मुलांना लुटता येत नसली तरी कुटुंबावर आलेल्या नैसर्गिक संकटाच्या जाणीवेतून ही शाळकरी मुले छावणीत राहून आपली सुट्टी घालवत त्यात आनंद मानत आहे. कधी सायकलवर बसून मैलोन्मैल जाऊन पाणी शोधायचे आणि आता छावणीत राहून जनावरांना चारा-पाणी द्यायचे, अशा कामात त्यांना आपली सुट्टी कशी संपत आहे, याची जराही जाणीव नाही.
दुष्काळाने हिरावली सुट्टीतील मज्जा!
By admin | Updated: May 8, 2016 00:50 IST