अहमदनगर : उडिदाला ५ हजार व तुरीला ५०५० रूपये प्रति क्विंटल हमीभाव मिळणार आहे. शेतकऱ्यांनी इतर डाळींचे जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे. त्यालाही केंद्र सरकार हमीभाव देण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव हेमकुमार पांडे यांनी बुधवारी येथे दिली.नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव चड्डा, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक नीलिमा केरकट्टा, सरव्यवस्थापक ए. जी. पवार यांच्यासमवेत पांडे यांनी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मुगाच्या हमीभाव केंद्रास भेट दिली. तसेच लिलावांच्या ठिकाणी जाऊन शेतमालाच्या भावाबाबत माहिती घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, सभापती हरिभाऊ कर्डिले, उपसभापती नारायण आव्हाड यांच्यासह कृषी खात्याचे अधिकारी हजर होते. केंद्रीय सचिव पांडे म्हणाले, हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकू नये. हमीभाव केंद्रातच माल विकावा. केंद्रात माल दिल्यानंतर तातडीने पेमेंट अदा होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. भारतात ४ गावे स्वयंपूर्ण असून यात नगर जिल्ह्यातील दोन गावे आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. (प्रतिनिधी)
उडीद ५ हजार,तूर ५०५० रुपये प्रति क्विंटल दर
By admin | Updated: September 14, 2016 23:25 IST