अहमदनगर: महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी डॉ़ अनिल बोरगे यांच्या नियुक्तीचा अहवाल नगरविकास खात्याने मागविला आहे़ शासनाने बोरगे यांची शैक्षणिक पात्रता आणि शासन निर्णयाची प्रत मागविली असून, गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली बोरगे यांच्या नियुक्तीची फाईल पुन्हा उघडणार आहे़यावर नगरविकास खात्याकडून महापालिकेच्या अहवालावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़आरोग्य अधिकारीपदी डॉ़ अनिल बोरगे यांच्या नियुक्तीचा विषय प्रशासनाने सर्वसाधारण सभेला सादर केला होता़ तत्कालीन आयुक्त संजय काकडे यांच्याकडून हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता़ शासन निर्णय आणि शैक्षणिक पात्रता, बाबतचा हा प्रस्ताव होता़ सदर विषय सर्वसाधारण सभेसमोर आला असता सदस्यांनी बोरगे यांच्या पदोन्नतीस कडाडून विरोध केला़ बोरगे यांच्या शैक्षणिक पात्रतेवर सदस्यांनी त्यावेळी आक्षेप घेतला़ या पदावर दुसरे उपआरोग्य अधिकारी पैठणकर यांनीही दावा केला होता़ परंतु बोरगे यांनी शैक्षणिक पात्रतेचा निकष पूर्ण केला असल्याने त्यांना पदोन्नती देण्यावर चर्चा झाली़ मात्र सदस्यांनी विरोध केल्याने बोरगे यांची नियुक्ती लांबणीवर पडली़ अखेर शासनाने बोरगे यांच्या नियुक्तीची शिफारस केली़ मात्र बोरगे यांची अधिकृत नियुक्ती केली गेली नाही़ त्यामुळे बोरगे यांची नियुक्ती रखडली़ याविषयी नगरविकास खात्याच्या सचिवांकडूनच आता अहवाल मागविण्यात आला़ बोरगे यांच्या नियुक्तीबाबतचा शासन निर्णय आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतचा अहवाल तात्काळ सादर करा, अशा आशयाचे पत्र महापालिकेस नुकतेच प्राप्त झाले आहे़ त्यानुसार महापालिकेडून अहवाल पाठविण्यात आला आहे़ रक्तपेढीतील रक्त पिशव्या खराब झाल्या प्रकरणी बोरगे यांना महासभेने निलंबित केलेले आहे़ त्यांच्यावरील या कारवाईचा निर्णय महासभेत झाला आणि तत्कालीन आयुक्त संजय काकडे यांनी बोरगे यांना तातडीने निलंबित केले़ तेव्हापासून ते कामावर नाहीत़ त्यांना कामावर घेण्याचा ठराव झाल्याचे समजते़ (प्रतिनिधी)
नगरविकास खात्याने मागविला नियुक्तीचा अहवाल
By admin | Updated: February 27, 2023 14:52 IST