पाथर्डी : ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ व श्री तिलोक जैन परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी पाथर्डी शहरात घेतलेल्या रक्तदान शिबिरास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शिबिरात ५१३ जणांनी रक्तदान केले. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने रक्तदान अभियानात सहभागी झाल्या. ग्रामीण भागातील नागरिक स्वतः पदर खर्चाने खासगी वाहनातून रक्तदानासाठी आले होते, हे विशेष.
‘लोकमत’ने रक्तदान शिबिराची संकल्पना श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे यांच्यासमोर मांडली. संस्थेचे सचिव सतीश गुगळे, खजिनदार सुरेश कुचेरिया, विश्वस्त धरमचंद गुगळे, राजेंद्रकुमार मुथा, डॉ.ललीत गुगळे यांनी सध्या रक्ताची गरज ओळखून शिबिरास सर्व प्रकारची मदत करण्याचे ठरविले. त्याचबरोबर, माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, शिव प्रतिष्ठान सुवर्ण युग तरुण मंडळ आदींनी शिबिरात सहभाग घेतला. श्री तिलोक जैन परिवारात तीनशे शिक्षक कार्यरत आहेत, तसेच सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
सतीश गुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी आराखडा तयार करून, प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थांच्या पालकांशी संपर्क साधून पालकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. पंधरा दिवस या रक्तदानाचे नियोजन चालू होते. ज्या शिक्षकाने पालकांशी संपर्क साधला व जे रक्तदान करण्यासाठी तयार झाले, त्यांची यादी तयार करण्यात आली.
त्यानुसार, सोमवारी सकाळपासून रक्तदानास सुरवात करण्यात आली. दिवसभर जसे कार्यकर्ते ‘बुथ’वर मतदानच्या दिवशी हजर असतात. तशाच प्रकारे सर्व शिक्षक, प्राचार्य, मुख्याधापक, संस्था चालक रक्तदान शिबिरास्थळी हजर होते. अपेक्षित आकडा होण्यासाठी सर्वांची धावपळ होती. शेवटी रक्तदानाचा अपेक्षित आकडा रात्री मिळाला आणि सर्वांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
सकाळी श्री आनंद कॉलेज येथे शिबिराचे उद्घाटन पार पडले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे होते. राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज, ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, विश्वस्त धरमचंद गुगळे, राजकुमार मुथा, डॉ.ललीत गुगळे, प्राचार्य डॉ.शेषराव पवार, डॉ.दीपक देशमुख, डॉ.सचिन गांधी, डॉ.अभय भंडारी, संपतलालजी गांधी, प्राचार्य जी.पी. ढाकणे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा.मुख्तार शेख यांनी केले. स्वागत ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी उमेश कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अनिता पावसे, प्रा.जयश्री खेडकर यांनी केले.
शिबिर यशस्वितेसाठी ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी उमेश कुलकर्णी, प्राचार्य अशोक दौंड, त्यांचे सहकारी मुख्याधापक राजाराम माळी, चिचोंडी विद्यालयाचे प्रभारी दिलावर फकीर, फार्मसीचे प्राचार्य विलास भागत आदींनी परिश्रम घेतले.