लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी : विकास, समृद्धी हे उद्धव ठाकरेंचे काम नाही. विरोधकांना शिव्या घालणे अन् चांगल्या कामात विघ्न आणण्याचे काम ते करत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिर्डीत केली. पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष राहणार नाही, असा दावाही राणे यांनी यावेळी केला.
भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी श्रीरामनवमीनिमित्त सपत्नीक शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा समाचार घेतला. विधायक सामाजिक विकासकामांची विचारसरणी उद्धव ठाकरे यांची नाही. ३९ वर्ष मी उद्धव ठाकरेंबरोबर काम केले. बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी पक्ष होता. साहेब गेले आणि शिवसेना संपली, असेही राणे म्हणाले.
संजय राऊत सकाळी उठल्यावर घराबाहेर मीडियाशी बोलून दुकान चालवतो. संजय राऊतने आपले कर्तृत्व सांगावे. देशासाठी, राज्यासाठी आणि स्वतःच्या गावासाठी काय योगदान आहे. संजय राऊतच्या कुठल्याही भाष्याला मी उत्तर देणार नाही. संजय राऊतला मूर्ख माणूस समजत असल्याचे ते म्हणाले.
कृषिमंत्री कोकाटे यांचे मत चुकीचे
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या व्यक्तव्यावर बोलताना, कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल व्यक्त केलेले मत चुकीचे आहे, असेही राणे म्हणाले.