अहमदनगर : जंतुनाशक फवारणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या दोन कर्मचा-यांना नागरिकांनी जबर मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.२ एप्रिल) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात महापालिकेच्या वतीने जंतुनाशक फवारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे अग्निशमन बंब नागापूर परिसरात फवारणीसाठी गेले असता नागरिकांनी इकडेच घे तिकडे घे... असे आग्रह धरीत अग्निशमन बंब दुस-या भागात घेण्याची मागणी केली. यावरून कर्मचारी व नागरिकात वाद झाला. दरम्यान अग्निशमन बंब चालक व नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. दोन कर्मचा-यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. याप्रकरणी महापालिकेच्यावतीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात येत असल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी सांगितले.
नगरमध्ये महापालिकेच्या दोन कर्मचा-यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:22 IST