चांदेकसारे : कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर चांदेकसारे गावानजिक गुरूवारी पहाटे तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन चौघे जखमी झाल्याची घटना घडली. वाहने रस्त्यावर आडवी झाल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आयशर (क्रमांक एम.एच.०४, ९९१६), आयशर(क्रमांक यु.पी.३५, ०४९८) व मालट्रक(क्रमांक एम.एच.२६,५३१६) या तिन्ही वाहनांचा कोपरगाव-संगमनेर रसत्यावर चांदेकसारे शिवारात बाळासाहेब खरात यांच्या घरासमोर विचित्र अपघात झाला. या अपघातात प्रभाकर जावळे, तौफिक शेख, नसिम पठाण व धर्मेंद्र कुशवाह असे चौघे गंभीर जखमी झाले. मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
दुतर्फा वाहनांच्या रांगा
अपघातानंतर तिन्ही वाहने रस्त्यावर आडवी झाल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. याप्रकरणी पोलीस पाटील मीरा रोकडे व उपसरपंच रवींद्र खरात यांनी भ्रमणध्वनीवरून पोलिसांना माहिती दिली. दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव कडनोर, हेड काँस्टेबल अर्जुन बाबर, एकनाथ बच्छे, बाबासाहेब सांगळे, सुरेश पवार, सुभाष आव्हाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संजय होन, केशव होन, विनोद खरात, कांतीलाल होन, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, लक्ष्मण पवार व ग्रामस्थांच्या मदतीने वाहने बाजूला करण्यात आल्यावर दोन तासाने वाहतूक सुरळीत झाली.