श्रीरामपूर : अखिल भारतीय काँग्रेस समितीने श्रीरामपूर राखीव विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली असताना नेते जयंत ससाणे पक्षाबाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. अशा स्थितीत उमेदवारीची हळद तर लागली, पण निवडणुकीचे लग्न लावायला वऱ्हाड कुठंय? अशी विचित्र अवस्था कांबळे यांची झाली आहे. पक्षाने उमेदवारी दिली असली तरी ५ वर्षांपूर्वी स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा, संघटना नसताना ससाणेंच्या संघटनेच्या जोरावर कांबळे आमदार झाले. या ५ वर्षातही कांबळेंना स्वतंत्र संघटना, यंत्रणा उभारता आली नाही. त्यांनीही तसा प्रयत्न केला नाही. ५ वर्षांतील सर्वच लहान, मोठे कार्यक्रम केले तेही ससाणेंच्या यंत्रणेच्या मदतीने. आता आमदार म्हणून कांबळेंच्या गाडीत कार्यकर्तेही दिसत नाहीत. ते अन् वाहन चालविणारा त्यांचा सारथी, एवढीच त्यांच्या १८ क्रमांकाच्या गाडीतील गर्दी. ज्यांनी आमदारकी व आताही काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली, ते ससाणे पक्ष सोडायला निघाले आहेत. शिवसेनेत प्रवेश करण्याचा त्यांचा जवळपास निर्णय झाला आहे. गुरूवारीही त्यांना कार्यकर्त्यांनी तोच आग्रह केला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाप्रमाणे ससाणे सेना-भाजपामध्ये गेल्यास आपल्यामागे कार्यकर्ते राहणार कोण?असा प्रश्न कांबळेंना पडला आहे. गेल्या निवडणुकीत ससाणेंच्या संघटनेने कांबळेंची सर्व प्रचार यंत्रणा सांभाळली. कांबळे स्वत:च्या जीवावर स्वत:ची स्वतंत्र निवडणूक प्रचार यंत्रणा उभी करू शकत नाहीत. त्यामुळेच उमेदवारीची हळद लागली असली तरी वऱ्हाड जमणार कसे? वऱ्हाडच सोबत नाही तर विधानसभेचे लगीन लागणार कसे? असे प्रश्नांवर प्रश्नच निर्माण झाल्याने कांबळे चिंताग्रस्त झाले असून त्यांची सर्व भिस्त ससाणेंवर राहिली आहे. त्यामुळेच ससाणे म्हणतील ती पूर्व दिशा अशी भूमिका कांबळेंना घ्यावी लागत आहे. (प्रतिनिधी)
हळद लागली, पण वऱ्हाडच नाही..!
By admin | Updated: September 26, 2014 00:16 IST