भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून दोन बछड्यांसह मादी बिबट्याने अनेकांना दर्शन दिले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खंडेश्वरवाडीत बिबट्याचे दर्शन झाले होते. दोन दिवसांपूर्वी येथील माजी सरपंच प्रा. बबनराव भुजबळ यांच्या कापरी नदीलगत असलेल्या शेताजवळ असलेल्या कुस्ती मैदानाच्या परिसरात सकाळी धुणे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या काही महिलांना बिबट्यासह त्याच्या बछड्यांचे दर्शन झाले. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास येथील शेतकरी संजय भुजबळ हे शेतामध्ये काम करीत असताना त्यांनाही बिबट्याचे दर्शन झाले. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सध्या शेतकऱ्यांना विजेच्या उपलब्धतेनुसार रात्री-अपरात्री शेतामध्ये पाणी भरण्यासाठी जावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिकांना पाणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीने दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
यासंदर्भात येथील वनरक्षक बढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामस्थांनी बिबट्या पाहिलेल्या ठिकाणाची पाहणी करून पुढील उपाययोजना काय करता येतील, त्यासाठी वरिष्ठांशी संपर्क साधू, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता ही मादी बिबट्या व बछडे निदर्शनास आल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.