मच्छिंद्र अनारसे/ऑनलाइन लोकमतकर्जत (अहमदनगर), दि. 26 - रखरखत्या उन्हापासून बागेचा बचाव करण्यासाठी बरगेवाडी शिवारात तीन हजार डाळिंबाची झाडे कापडाने झाकण्याचा अनोखा प्रयोग एका शेतकऱ्याने केला आहे़ विशेष म्हणजे ही झाडे झाकण्यासाठी या शेतकऱ्याने गुजरातहून पारदर्शक कापड आणले आहे़कर्जत तालुक्यात बरगेवाडी शिवारात पृथ्वीराज चव्हाण व अभिजीत चव्हाण यांनी माळरानावर डाळिंबाची बाग फुलवली आहे. येथे दहा एकर क्षेत्रावर ही बाग आहे. या बागेत तीन हजार दोनशे झाडांची लागवड केली आहेत. कर्जतसारख्या दुष्काळी भागात त्यांनी डाळिंब बागेचा प्रयोग केला आहे. चव्हाण बंधूंनी नोकरीच्या मागे न लागता शेतीवर लक्ष केंद्रीत केले आहे. जमिनीची मशागत करून येथे डाळिंबाची बाग तयार केली आहे. ही बाग कर्जत कुळधरण रोड लगत आहे. डाळिंबाची झाडे व फळांचे उन्हापासून संरक्षण करणे, तसेच दर्जेदार निर्यातक्षम फळे तयार करण्याचे ध्येय चव्हाण बंधूंनी ठेवले.गुजरात राज्यातील शेतकऱ्यांनी या अगोदर असे प्रयोग केला होता. यामध्ये त्यांना यश आले. या गोष्टीचा विचार करून त्यांनी संपूर्ण बागेलाच दर्जेदार कापडाने झाकले आहे. या कापडामुळे तापमान १० अंश सेल्सिअसने कमी होते. यामुळे झाडे व फळे यांचे संरक्षण होते. हा प्रयोग कर्जत तालुक्यातील पहिलाच आहे. शिवाय या प्रयोगामुळे फळांना चकाकी येते. फळांवर डाग पडत नाहीत. पाणी बचत होते. उत्पादन वाढते. मजुरी खर्च कमी येतो. या शेतीत त्यांनी सेंद्रीय शेतीवर भर दिला आहे. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभले असून, युरोपच्या बाजारात हे डाळिंब पाठविणार असल्याचे चव्हाण बंधूंनी सांगितले़ साडेतीन लाख खर्चपृथ्वीराज चव्हाण व अभिजीत चव्हाण हे शेतकरी गुजरातला गेले असताना त्यांनी तेथे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ग्रो कव्हर या कापडापासून झाडे झाकण्याचा प्रयोग पाहिला होता़ त्यानंतर त्यांनी गुजरातवरुन हे कापड आणून कर्जतमधील आपल्या शेतात हा प्रयोग राबविला आहे़ हे कापड १७ मायक्रॉन जाडीचे असून, संपूर्ण झाडे झाकण्यासाठी त्यांना २८ हजार ८०० स्केअर मीटर कापड लागले असून, मजुरीसह ३ लाख ५६ हजार ८०० रुपये खर्च आला आहे़ या बागेतून १२० टनापर्यंत माल निघू शकतो, असा विश्वास चव्हाण बंधूंनी व्यक्त केला़
उन्हापासून बचावासाठी कापडाने झाकली तीन हजार झाडे
By admin | Updated: February 26, 2017 17:16 IST