स्टार १०६५
श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच महिन्याच्या अंतरात दोन जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र दोन्ही घटनांमधील चोर आणि चोरीतील मुद्देमाल परत मिळविण्यात पोलिसांना यश आलेले नाही. चोरीच्या घटनांचा पोलिसांना तपास का लागत नाही? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
दोन्ही घटनांना पोलिसांनी गांभीर्याने घेतले. तपासाची चक्रे फिरविली. नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच ठसेतज्ज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले. श्वानाची मदत घेण्यात आली. मात्र, असे असले तरी दोन्ही घटनांमध्ये तपासात पोलिसांना कोणत्याही पातळीवर यश मिळालेले नाही. अद्याप चोरांचा कोणताही मागमूस पोलिसांना लागलेला नाही. चोरटे आणि मुद्देमाल हाती न लागल्याने पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
----------
नऊ तोळे सोने लंपास
शहरातील बोंबले वस्ती परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी १० ऑगस्टला प्रा. विठ्ठल सदाफळ यांच्या बंगल्यामध्ये जबरी चोरी केली होती. चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बंगल्याचे गेट तोडून आत प्रवेश केला. प्राध्यापकांची पत्नी, त्यांची मुले या सर्वांना चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने, लॅपटॉप व रोख रक्कम चोरून नेली. ३५ हजार रुपये रोख व ९ तोळे सोने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. चोरीच्या या घटनेत आठ ते दहा जण सहभागी असण्याची शक्यता व्यक्त केली गेली.
--------
तीन लाखांचे सोने लंपास
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निपाणीवाडगाव शिवारात माजी सरपंच आशिष दौंड यांच्या घरी मागील महिन्यात जबरी चोरीची घटना घडली. तेथे चोरट्यांनी तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले होते. रोख रक्कमही चोरट्यांनी पळविली होती.
--------
दोन्ही गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू आहे. थोडा वेळ लागेल. मात्र, गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात येतील.
-संजय सानप, निरीक्षक, शहर पोलीस ठाणे
--------