(डमी)
अहमदनगर : कोरोनाच्या स्थितीमुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. आता परीक्षा रद्द झाल्याने परीक्षेसाठी भरलेले शुल्कही शासनाने विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी विद्यार्थी तसेच पालकांमधून होऊ लागली आहे. नगर जिल्ह्यात दहावीसाठी तब्बल ७३ हजार विद्यार्थी बसले होते. त्यांच्या सुमारे तीन कोटींचे शुल्क शासनाकडे अडकले आहे.
मागील वर्षीपासून कोरोनाची स्थिती गंभीर असल्याने शाळा बंद आहेत. मध्यंतरी कोरोना आटोक्यात आल्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या होत्या, मात्र नंतर त्या बंद करण्यात आल्या. शिक्षण विभागाने प्रथम पहिली ते आठवी आणि नंतर नववी ते अकरावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सीबीएससी बोर्डाने प्रथम दहावीची परीक्षा रद्द केली. त्यापाठोपाठ राज्य बोर्डाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
नगर जिल्ह्यात ९६१ शाळांमधून दहावीसाठी ७३ हजार १३९ विद्यार्थी नोंदणीकृत झाले होते. परीक्षा रद्द झाल्याने हे सर्व विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार आहेत. दरम्यान दहावीच्या परीक्षेसाठी प्रत्येकी ४१५ रुपये परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांनी भरले होते. त्यानुसार ३ कोटी ३ लाख रुपये शुल्क परीक्षेपोटी शासनाकडे जमा आहे. परीक्षा रद्द झाल्या आहेत तर शासनाने हे शुल्कही विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी पालक, विद्यार्थ्यांमधून होऊ लागली आहे.
------------------
जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा - ९६१
दहावीतील एकूण विद्यार्थी - ७३१३९
प्रती विद्यार्थी परीक्षा शुल्क - ४१५
परीक्षा शुल्काची एकूण रक्कम - ३ कोटी ३ लाख
-------------
दहावीची परीक्षा रद्द झाल्याने शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे.
- तुषार देवकर, विद्यार्थी
---------------
शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली, मात्र आता पुढील प्रवेश कसे होणार याबाबत अद्यापही विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. शिवाय परीक्षेच्या फीसाठी शासनाने प्रत्येकी ४१५ रुपये शुल्क घेतले आहे. आता परीक्षाच होणार नसल्याने ते परत करावे.
- अक्षय पवार, विद्यार्थी
--------------
वर्षभर दहावीचा अभ्यास केला. मात्र शासनाने ऐनवेळी परीक्षा रद्द केली. आता गुणपत्रिका कशी असणार याबाबत काही माहिती नाही. अंतर्गत मूल्यमापन, तसेच सीईटी बाबतही चर्चा सुरू आहे. मात्र पुढील प्रवेश कसा याबाबत अजूनही गोंधळ सुरूच आहे.
-परमेश्वर म्हस्के, विद्यार्थी
----------------
माध्यमिक विभागाचा भोंगळ कारभार
जिल्ह्यात किती? माध्यमिक शाळा आहेत, त्या शाळेतून यंदा दहावीसाठी किती? विद्यार्थी बसले? दहावीचे परीक्षा शुल्क किती? ही प्राथमिक माहिती माध्यमिक विभागाच्या एकाही अधिकारी, कर्मचाऱ्याकडे नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडूनही फोन उचलला जात नाही. या विभागात सगळाच भोंगळ कारभार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
----------------