गाव तेथे लसीकरण आरोग्य विभागाची मोहीम .
सुहास पठाडे
नेवासा : मागील चौदा महिन्यांत नेवासा तालुक्यात बाधित झालेले दहा हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने सध्या ‘गाव तेथे लसीकरण’ ही मोहीम राबविण्यात येत असून उपलब्ध लसीद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. जनता कर्फ्यूमुळे शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यातील दुसरा कोरोना बाधित रुग्ण नेवासा तालुक्यात आढळून आला होता. त्यानंतर तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. यंदा एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून तालुक्यातील ११८ पेक्षा जास्त गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. गेल्या वर्षभरात तालुक्यात ११ हजार ५ कोरोना बाधित आढळले आहे .मात्र आता रुग्णवाढी बरोबरच कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे असल्याचे ही दिलासादायक बाब ठरत आहे. सध्या ६७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील महिन्यात रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात बेड मिळत नव्हते आता मात्र .तालुक्यातील कोविड केअर सेंटर व हॉस्पिटलमध्ये पाचशेहून अधिक बेड उपलब्ध आहेत.
प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसीलदार रुपेश सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सर्यवंशी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मोहसीन बागवान, पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, नगरपंचायत कर्मचारी, ग्रामीण भागातील स्थानिक दक्षता समित्या अहोरात्र काम करत आहे.
---------------
ज्येष्ठांच्या लसीकरणास प्राधान्य
तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तेथे लसीकरण ही संकल्पना राबवून ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रामार्फत लसीच्या उपलब्ध साठ्यानुसार पाच गावात जाऊन ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे.
-----------------------
जनता कर्फ्यूमुळे रुग्णसंख्या आटोक्यात
नेवासा शहरात मागील दीड महिन्यात मोठी रुग्ण वाढ झाली परंतु १४ मे ते २३ मे दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात आल्याने मागील काही दिवसापासून रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. जनता कर्फ्यू सुरू असताना मागील दहा दिवसांत शहरातील बहुतांश प्रभागात नगरपंचायती मार्फत ७८१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये अवघे दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून नियम तोडणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू असल्याची माहिती नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक रवींद्र गुप्ता यांनी दिली.
------------------------------
तालुक्यातील दहा हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले असताना गंभीर रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. हिवरे बाजार पॅटर्न प्रमाणे स्थानिक दक्षता समितीने काम केल्यास व नागरिकांनी नियम पाळल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल त्यासाठी तालुक्यात प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे.
- रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार. नेवासा