अहमदनगर : जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना, दुष्काळी स्थितीत अल्प पाण्यावर घेतलेल्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दिल्लीगेट वेशीला कांद्याचा फास लटकवून आक्रोश आंदोलन केले. यावेळी उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, राज्यसरकारने एकाधिकार पध्दतीने कांदा खरेदी करुन तो निर्यात करावा व कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, आदी मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या. आंदोलनात कांद्याच्या गडगडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचा वाढणाऱ्या आत्महत्येचा जीवंत देखावा सादर करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात अॅड.कारभारी गवळी, पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे, जालिंदर बोरुडे, सुधीर भद्रे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, वीर बहादूर प्रजापती, दिलीप वाकळे, बाळासाहेब सुंबे, कान्हू सुंबे, ओम कदम, संजय सोंडकर, मंदाताई जरे, बाबासाहेब जरे, भानुदास आवारी आदींसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजारात भाव गडगडल्याने कर्ज काढून लावलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्याने घेतलेले कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. कांद्याच्या भावाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. चाऱ्याच्या स्वरुपात कांदा जनावरांपुढे टाकण्याची नामुष्की ओढवली असून सरकारने निर्णयात्मक पाऊल न उचलल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार असल्याचे अॅड.गवळी यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना कांद्याच्या कमी भावाच्या ओढवलेल्या संकटातून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घेऊन कांद्याला १५ ते २० रुपये किलो भाव देणे गरजेचे असल्याची मागणी सुधीर भद्रे यांनी केली. (प्रतिनिधी)
कांद्याचा फास लटकवून शेतकऱ्यांचे प्रतीकात्मक आंदोलन
By admin | Updated: May 23, 2016 01:14 IST