वादग्रस्त व सध्या निलंबित असलेला कोतवाली पोलीस स्टेशनचा तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्याविरोधात महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा चार महिन्यांपूर्वी दाखल झाला होता. विशेष म्हणजे याच महिलेने त्याच्याविरोधात याआधीही अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. परंतु आधीच्या गुन्ह्यातून त्याला जामीन मिळाला. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२१ रोजी या महिलेने वाघ याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार व मारहाण केल्याची फिर्याद दिली होती. तेव्हापासून वाघ फरार होता. तत्पूर्वीच
त्याला निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, वाघ हा नाशिकमध्ये त्याच्या फ्लॅटमध्ये लपला असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली. त्यानंतर तोफखान्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरुवारी सकाळी आठ वाजताच नाशिकमधून वाघ याला ताब्यात घेतले. गुरुवारी दुपारीच
त्याला नगर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याच्याकडे गुन्ह्यासंदर्भात सखोल चौकशी करायची आहे. त्याला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली का, तसेच वाघ याने ज्या दांडक्याने महिलेला मारले ते दांडके जप्त करायचे आहे, यासाठी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद तोफखाना पोलिसांकडून करण्यात आला. त्यावरून न्यायालयाने वाघ याला २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.