बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे कामगार तलाठ्याची तातडीने नेमणूक करावी, या प्रमुख मागणीसाठी ‘मनसे’च्यावतीने मंगळवारी शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील बोधेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ‘मनसे’चे विभाग प्रमुख जलील सय्य्द यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या कामगार तलाठ्याची मार्च, एप्रिलमध्ये बदली झाल्याने तात्पुरता कार्यभार बालमटाकळी येथील कामगार तलाठ्याकडे देण्यात आला. या तलाठ्याकडे सुमारे दहा गावाचा सजा देण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयात वेळेत हजर रहात नसल्याने विद्यार्थ्यांना विविध शालेय दाखले व शेतकऱ्यांना सात बारा उतारे रखडले आहे. त्यामुळे विद्यार्थी, शेतकऱ्यांना शेवगावला तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. यामध्ये त्यांचा वेळ जाऊन आर्थिक भुर्दंडही बसतो. बोधेगाव येथे कायमस्वरूपी तलाठ्याची नेमणूक करावी, अशी वारंवार मागणी करुनही कार्यवाही न झाल्याने ‘मनसे’च्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मंडलाधिकारी विकास जोशी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन येत्या दोन दिवसात कामगार तलाठ्याची कायमस्वरुपी नेमणूक करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शेवगाव तालुक्यात तलाठ्यांची संख्या कमी असल्याने एका तलाठ्याकडे अतिरिक्त अधिभार दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे रिक्त तलाठ्यांची मागणी केली असून आठवडाभरात नवीन तलाठी मिळतील, असे मंडलाधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)
तलाठ्यासाठी बोधेगावात रास्ता रोको
By admin | Updated: July 23, 2014 00:18 IST