कर्जत : कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कर्जत येथे छत्रपती शिवाजी चौकात तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांच्या नेतृत्वाखाली तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावे, शेतसारा माफ करावा, दुधाला ३० रुपये भाव मिळावा, गावनिहाय चारा छावण्या, भिमा नदीत पाणी सोडण्यात यावे, प्राण्यांसाठी चारा व पाण्याची सोय करावी, कर्जत शहराला नियमितपणे पाणी पुरवठा करण्यात यावा, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या.तालुकाध्यक्ष अॅड. बाळासाहेब शिंदे, युवा नेते राजेंद्र गुंड, प्रदेश सरचिटणीस शहाजीराजे भोसले, विजय मोढळे यांची भाषणे झाली. जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब तापकीर, किरण पावणे, बारडगावचे उपसरपंच संजय सुद्रीक, कापरेवाडीचे उपसरपंच बबन खळगे, सुधीर जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लहू वतारे, सचिन मांडगे आदी यावेळी उपस्थित होते. शेवगावात कांदा रस्त्यावरशेवगाव : तीव्र दुष्काळस्थितीत जनतेला पिण्याचे पाणी पुरविण्यात प्रशासनास येत असलेले अपयश तसेच शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी येथील क्रांती चौकात रस्त्यावर कांदा ओतून रास्ता रोको आंदोलन केले.चंद्रशेखर घुले, युवक नेते क्षितीज घुले, ‘ज्ञानेश्वर’चे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने, जिल्हा उपाध्यक्ष अरुण लांडे, युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, शहराध्यक्ष मन्सूर फारोकी, रामनाथ राजपुरे, पंडीत भोसले, बाळासाहेब मुंदडा, संजय शिंदे यांची भाषणे झाली. आंदोलनात माधव काटे, ताहेर पटेल, अंबादास कळमकर, बबनराव भुसारी, शाहुराव घुटे, अनिल मडके, सखाराम लव्हाळे, आयुब शेख, अमर जाधव, हनुमान पातकळ, कमलेश लांडगे, भागवत लव्हाट, कृष्णा ढोरकुले, साईनाथ आधाट, अजय भारस्कर, सागर फडके, माणिक थोरात आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदार दादासाहेब गिते यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनामुळे शहराच्या चारही प्रमुख मार्गावरील वाहतूक जवळपास तासभर ठप्प झाल्याने वाहनधारक व प्रवाशांची मोठी कुचंबणा झाली. पारनेरमध्ये ठिय्यापारनेर : जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असल्याने जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या, पारनेर तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराची चौकशी करावी, दुष्काळात जळालेल्या फळबाग पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे, पारनेर पुरवठा विभागातील अनागोंदी करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे नेते, जि.प. सदस्य सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पारनेर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तहसीलदार भारती सागरे हजर नसल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीला हार घातला. निवासी नायब तहसीलदार प्रियंका ठोकळ-आंबेकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच पुरवठा विभागातील अशासकिय लोकांना दूर करण्याची मागणी दीपक नाईक, योगेश मते, सोन्याबापू भापकर, विक्रमसिंह कळमकर यांनी केली. आंदोलनात सभापती अरूण ठाणगे, पारनेरचे माजी सभापती गंगाराम बेलकर, शंकर नगरे, बाजार समितीचे संचालक वसंतराव मोरे, सरपंच शिवाजीराव औटी युवक सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)पाथर्डीत नारेबाजीपाथर्डी : पाथर्डी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, जनावरांसाठी छावण्या व पिण्याचे पाणी मिळावे, शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ करावे, जायकवाडी धरणातून होणारा पाणीपुरवठा दिवसाआड करावा या व इतर प्रमुख मागण्यासंदर्भात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्यावतीने मंगळवारी पाथर्डी तहसील कार्यालयासमोर युती शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करुन निषेध नोंदविला. राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश बोरूडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरूडे, संभाजी ब्रिगेडचे नाशिक विभागाचे उपाध्यक्ष सुनीलराजे कदम, योगेश रासने, सागर इधाटे, चंद्रकांत मरकड, राजेंद्र दुधाळ, गणेश कर्डिले आदींसह कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात नारेबाजी करीत तहसीलदारांना निवेदन दिले. तालुक्याचे लोकप्रतिनिधी, पालिका पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, भाकड जनावरांची हमी सरकारने घ्यावी तसेच शेतकऱ्यांना बियाणे, खते मोफत द्यावी, आदी मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या.
दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादीचा रास्ता रोको
By admin | Updated: May 11, 2016 00:10 IST