श्रीगोंदा : श्रीगोंदा बस स्थानकात बसमध्ये बसण्यावरून झालेली वादावादी सोडविण्यासाठी गेलेल्या महिला वाहकाला मारहाण करण्यात आली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात महिलेसह दोघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.श्रीगोंदा- दौंड बसमध्ये रुक्मिणी जाधव ही महिला डोक्यावर गाठोडे घेऊन बसमध्ये चढत असताना या गाठोड्याचा धक्का बसमध्ये चढणा-या विठ्ठल खेतमाळीस (वय ७८ रा. श्रीगोंदा) यांना लागला. यावरुन त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली. ती शिवीगाळपर्यंत गेली. हा प्रकार बसमधील वाहक सीमा काकडे यांनी पहिला. हा वाद मिटविण्यासाठी त्या गेल्या. मात्र याच काळात रुक्मिणी जाधव यांचे नातेवाईक संतोष जाधव व आणखी एकजण आले. व वाहकाच्या शेजारी बसलेले विठ्ठल खेतमाळीस यांना धक्काबुक्की करुन मारहाण करण्यास सुरवात केली. वाहक काकडे वाद सोडण्यासाठी गेल्या असता संतोष जाधव व रुक्मिणी जाधव यांनी वाहकास बेदम मारहाण केली. वाहक सीमा काकडे यांच्या फिर्यादीवरुन रुक्मिणी जाधव व संतोष जाधव यांना पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव करीत आहेत.
श्रीगोंदा बस स्थानकात महिला वाहकाला मारहाण; महिलेसह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:20 IST