अहमदनगर : अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स (श्वेतांबर)च्या राष्ट्रीय अध्यक्ष, प्रांतीय अध्यक्षासह कार्यकारिणीच्या २४ जागांसाठी नगरच्या केंद्रावर रविवारी उत्स्फूर्त मतदान झाले. राज्यातील १८ जिल्ह्यांतील मतदारांनी नगर येथील केंद्रावर मतदान केले. या निवडणुकीसाठी ५८ टक्के मतदान झाले. सायंकाळी मतमोजणीला सुरवात झाली होती.अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स (श्वेतांबर) या शिखर संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांसाठी रविवारी (दि. २२) मतदान झाले. राज्यात नगर,नाशिक, पुणे आणि मुंबई अशा चार ठिकाणी मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली.नगर येथे बडीसाजन ओसवाल मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान झाले. या मतदान केंद्रावर राज्यातील १८ जिल्ह्यातील मतदारांनी हजेरी लावली. त्यामुळे बडीसाजन मंगल कार्यालयात जैन बांधवांची मोठी गर्दी होती. नगर केंद्रावर ८ हजार ५६२ मतदार होते. त्यापैकी ४ हजार ९१० मतदारांनी मतदानासाठी हजेरी लावली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डी.डी. खाबिया आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण भंडारी यांनी दिली.जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी अशोक उर्फ बाबुशेठ सिमरतमल बोरा (नगर) आणि मोहनलाल चोपडा (नाशिक) यांच्यात थेट लढत झाली. चतुर्थ झोनच्या प्रांतीय अध्यक्षपदासाठी सतीश नारायणदास लोढा (नगर) आणि सुभाष बाबुलाल घिया जैन (नाशिक) यांच्यात थेट लढत झाली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २४ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी अशोक बोरा यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल, तर मोहनलाल चोपडा यांच्या नेतृत्वाखाली जय जिनेंद्र ग्रुप निवडणूक लढवित आहे. मतदान केंद्रावर पाचशे मतदारांसाठी एक बूथ अशा १५ बूथची व्यवस्था करण्यात आली होती. दोन्ही पॅनेलचे उमेदवार हात जोडून मतदारांना साद घालत होते. खासदार दिलीप गांधी यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांनीही मतदान केले. लोकमत मीडिया प्रा.लिमिटेडचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी रविवारी दुपारी बडीसाजन मंगल कार्यालयातील मतदान केंद्राला भेट देऊन दोन्ही पॅनलमधील उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार दिलीप गांधी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
जैन कॉन्फरन्ससाठी नगरमध्ये उत्स्फूर्त मतदान
By admin | Updated: May 23, 2016 01:13 IST