सोनई : एक वर्षात १ कोटी ९३ लाखांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन सोनई पोलिसांनी सोनई येथील व्यंकटेश पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह तिघाजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हे तिघेही फरार आहेत.याबाबत लेखापाल सुविद्या सोमाणी यांनी फिर्याद दिली. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत पतसंस्थेचे व्यवस्थापक शामसुंदर शंकर खामकर, लिपीक गणेश हरिभाऊ मोरे व रोखपाल गणेश अंबादास तांदळे यांनी पदाचा दुरुपयोग करुन स्वत:च्या फायद्यासाठी बेकायदेशिररित्या बनावट सही, शिक्क्याचा वापर करुन संस्थेची १ कोटी, ९३ लाख ७ हजार ६०६ रुपयांचा अपहार केला.या फिर्यादीनुसार सोनई पोलिसांनी या तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. व्यंकटेश पतसंस्था सोनई परिसरात नामांकीत पतसंस्था असून ही व्यापारी पतसंस्था म्हणून ओळखली जाते. वर्षांपासून ठेव पावतीची मुदत संपूनही ठेवीदारांना ठेवी परत न मिळाल्याने संस्थेच्या कामकाजावर संशय व्यक्त करण्यात येत होता. ठेवी परत मिळाव्यात यासाठी काही ठेवीदारांनी अलिकडे उपोषण केले होते.
सोनईच्या व्यंकटेश पतसंस्थेत १ कोटी ९३ लाखांचा अपहार; व्यवस्थापकासह तिघांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 18:51 IST