कर्जत : सैनिक स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून देशाची मान गर्वाने उंचावतात. कर्जत-जामखेडचे तरुण देशसेवेत जात आहेत, ही निश्चितीच कौतुकास्पद बाब आहे. सैनिक बांधव देशासाठी हिऱ्यांपेक्षाही मौल्यवान आहेत, असे गौरवोद्गार आमदार रोहित पवार यांनी काढले.
सैन्य दलात नव्याने भरती झालेल्या जवानांच्या सन्मान व कौतुक सोहळ्यात कर्जत येथे ते बोलत होते. यावेळी तालुक्यातून भरती झालेल्या २८ जवानांचा पवार व शहीद प्रदीप शंकर भोसले यांच्या मातोश्री कमल भोसले यांच्या हस्ते शाल-श्रीफळ, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ यांचा सन्मान करून आभार मानले. एनसीसीच्या छात्रसैनिकांना लष्कराप्रमाणे पाेलीस दलामध्येही आरक्षण मिळावे, अशा मागणीने निवेदन एनसीसी अधिकारी मेजर संजय चौधरी यांनी आमदार रोहित पवार यांना दिले. याबाबत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांबरोबर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे पवार यांनी सांगितले.