फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हाट्सॲपच्या माध्यमातून महिलांची बदनामी करण्याचे प्रमाण वाढले आहे. सराईत सायबर गुन्हेगारांसह ओळखीचे लोकही त्रास देण्याच्या उद्देशाने महिलेचे बनावट अकाउंट तयार करून अश्लील फोटो, मेसेज व्हायरल करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा-महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाइन क्लास सुरू झाले आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हातात स्मार्ट फोन आले आहेत. यातून फेसबुक, इन्स्टाग्रामवर अकाउंट ओपन करणाऱ्यांमध्ये तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. या प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक फोटो शेअरिंग, लाइव्ह व्हिडीओ, कॉलिंग अशा अनेक फिचर्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याचाच गैरफायदा सायबर हॅकर्स व फ्रॉड करणारे घेत आहेत.
----------------------
ब्लॅकमेलिंग, बदनामीच्या सर्वाधिक तक्रारी
फिशर्स युजर्सचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करून त्याचा गैरवापर करतात. शेअर केलेल्या फोटोंचे माॅर्फिंग करून त्याचे अश्लील फोटोमध्ये रूपांतर केले जाते. या माध्यमातून ब्लॅकमेलिंग, पैशांची मागणी असे प्रकार घडत आहेत.
सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींमध्ये ब्लॅकमेलिंग, बदनामी याच स्वरूपाच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. तरुण मुलींसह अनेक ज्येष्ठ महिलांचीही वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक झाल्याचे सायबर पोलिसांकडे दाखल अर्जातून निदर्शनास आले आहे. बनावट रूप धारण करून फसवणूक करत असल्याने अशा गुन्हेगारांना शोधणे कठीण असते.
...........
असे ओढतात जाळ्यात
फ्रॉड करणारे इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट ओपन करून तरुण मुलींशी प्रथम मैत्री करत त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. त्यानंतर त्यांचे फोटो, व्हिडीओ मिळवून त्यांना विविध कारणांसाठी ब्लॅकमेल करतात.
ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी केली जाते, तर कधी ऑनलाइन सेक्सट्रॉशन करतात. कधी हॉस्पिटलचे कारण सांगून भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेलिंग करून पैसे मागतात. बदनामीच्या भीतीने बहुतांशी तरुणी पोलिसांकडे तक्रारी करत नाहीत.
...........
तांत्रिक गोष्टींची माहिती असेल तरच इन्स्टाग्राम, फेसबुक व इतर प्लॅटफॉर्म वापरावेत. अशा प्लॅटफॉर्मवर आपली वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडीओ शेअर करू नयेत. अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नये, तसेच कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. फसवणूक झाली तर तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करावी.
- प्रतीक कोळी, उपनिरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन