अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात विक्रीस बंदी असलेल्या मालाची तस्करी करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढविली जात आहेत. रुग्णवाहिकेतून दारू वाहतुकीचे प्रकरण ताजे असतानाच टेम्पोत टरबूजाखाली लपवून सुगंधी तंबाखूची तस्करी होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. या कारवाईत १५ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.१) शहरातील काटवन खंडोबा रोड परिसरात एक टेम्पो पकडला. टेम्पोची तपासणी केली असता वरती टरबूजाचा थर होता. विक्रीस बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूच्या तब्बल १०५ गोण्या लपवून ठेवल्या होत्या़ बाजार मूल्यानुसार या तंबाखूची ९ लाख ४५ हजार रुपये किंमत आहे. टरबूज, टेम्पो व सुगंधी तंबाखू असा एकूण १५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी तंबाखूची तस्करी करणारे रमजान मन्सूर पठाण (वय २८) व आयाज इसाक बागवान (वय ३९, दोघे रा. काटवन खंडोबा परिसर, नगर) यांना ताब्यात घेतले. या दोघांनी ही सुगंधी तंबाखू औरंगाबाद येथील जुबेर नावाच्या व्यक्तीकडून आणली असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस कॉन्स्टेबल संदीप दरंदले यांच्या फिर्यादीवरून पठाण व बागवान यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टरबूजखाली लपवून सुगंधी तंबाखूची तस्करी; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 15:52 IST