भंडारदरा धरणाच्या परिसरातील कोलटेम्भे येथील न्हाणी फॉल या पर्यटनस्थळी पती-पत्नी चहाचा स्टॉल चालवतात. शुक्रवारी हे दांपत्य स्टॉलवर चहा बनवित असताना तेथे तवेरा वाहन (एम. एच. २०, बी. एन .६१९२) थांबले. त्यामधून सहा तरुण उतरले. त्यांनी स्टॉलवर अंडाभुर्जीची ऑर्डर दिली व त्यांनी समोरच्या स्टॉलवरून सिगारेट आणण्यास सांगितले. सिगारेट आणण्यासाठी दांपत्याने नकार दिल्याने तरुणांनी स्टॉल मालकास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या व शेजारील टपरी चालकांच्या दुकानांची मोडतोड करीत नुकसान केले. एका तरुणाने दुकान चालक महिलेचे कपडे ओढून तिचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे दुकानदार जमा झाले. मद्यधुंद तरुणांनी महिलेस सोडविणाऱ्यांनाही मारहाण केली. घडलेल्या घटनेची माहिती स्थानिकांनी राजूर पोलीस ठाण्यास कळविली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तरुणांना वन्यजीव विभागाच्या तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले. राजूर पोलीस ठाण्यात महिला व तिच्या पतीने तक्रार दाखल केली आहे.
दारुच्या नशेत सहा तरुणांनी केला महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST