श्रीरामपूर : कोरोनामुळे पती गमावून विधवा झालेल्या शहरातील महिलांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून महिलांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यस्तरीय कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती मिलिंदकुमार साळवे यांनी दिली.
पती गमावल्याने कुटुंबाचा डोलारा कोसळला. त्यातून अशा एकल पालकत्व आलेल्या महिलांवर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली आहे. मुला-मुलींचे शिक्षण व इतर आर्थिक, सामाजिक, उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे एकल पालकत्व ओढावलेल्या विधवा महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरावर समिती तयार करण्यात आली आहे. तालुका समितीचे मिलिंदकुमार साळवे, मनीषा कोकाटे, बाळासाहेब जपे, निलेश शेडगे, रंजन लोखंडे, डॉ. शेखर कोकाटे, फिलीप पंडित यांनी या महिलांच्या मागण्यांसाठी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांना निवेदन दिले.
-------