लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : देवस्थानच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिंगल युज प्लास्टिक हा चिंतेचा विषय आहे. किरकोळ विक्रेत्यांवर पाच हजारांचा दंड करण्यापेक्षा असे प्लास्टिक तयार करणाऱ्या कंपन्यांवरच कारवाई करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी गुरुवारी माध्यमांना सांगितले.
प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर कदम प्रथमच शिर्डीत साई दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर संस्थानच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे उपस्थित होते.
यावेळी कदम म्हणाले, धार्मिक विषयात ध्वनी खरोखर प्रदूषण करतो का? या विषयी मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होऊन धार्मिक तीर्थक्षेत्र ध्वनी प्रदूषणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. धार्मिक स्थळावरील ध्वनीबाबत कोणी आक्षेप घेतला तर यात प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका आणि पोलिस यांच्याकडे ध्वनी प्रदूषणाची तक्रार आल्यास त्यांनी खात्री करून यावर निर्णय घ्यायचा आहे.
सकाळचा भोंगा डोकेदुखी
सकाळाचा एक भोंगा लोकशाही जिवंत ठेवू शकत नाही. तो भोंगा डोकदुखी ठरत असून जनतेच्या मनात संभ्रम आणि विष पेरण्याचे काम करत असल्याची टीका कदम यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्यावर केली.