पाथर्डी : जुन्या वादातून पेट्रोल टाकून चारचाकी गाडी पेटवून दिल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे गावात घडली. या घटनेत कार पूर्णतः जळून खाक झाली.
सोमठाणे येथे जुन्या वादातून घरासमोर लावलेली ईटिंगा कार पेट्रोलने पेटवून देऊन महिलांना शिवीगाळ करण्याचा प्रकार शुक्रवारी रात्री दहा वाजता घडला. याबाबत संगीता काकडे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता विष्णू काकडे यांचा मुलगा रामेश्वर काकडे व गावातील तरुण संतोष माणिक खवले यांच्यात जुना वाद होता. हाच वादाचा मुद्दा ठरत गाडी जाळल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता संतोष खवले, अमोल खवले, राहुल खवले व दोन अनोळखी व्यक्तींनी काकडे यांच्या घरी येऊन रामेश्वर कुठे आहे, असे विचारले. त्यावेळी रामेश्वर हा बाहेर गेला असल्याचे त्याच्या आईने सांगितले. यावेळी संतोष खवले याने 'तो गावात लई शहाणा झाला आहे' असे म्हणत रामेश्वर काकडे यांच्या आईस व पत्नीस शिवीगाळ करत यातील वरील लोकांनी काकडे यांच्या घरासमोर असलेल्या शेडमधील ईटिंगा कारच्या काचा फोडून पेट्रोल टाकून पेटवून दिले. तसेच गुन्हा दाखल केला तर तुमच्या विरुद्ध खोटी तक्रार देऊ अशी धमकी दिली. '
दरम्यान, या घटनेनंतर संगीता काकडे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटे ३ वाजता संतोष खवले, अमोल खवले, राहुल खवले व दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी फरार आहेत. याबाबत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी अण्णा पवार हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे.