अहमदनगर : महापौर निवडणुकीसाठी सेनेच्या दोन गटांनी स्वतंत्र उमेदवारांची नावे सुचविली होती. मात्र रविवारी झालेल्या बैठकीत दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी एकत्र येत एकजुटीचा नारा दिला आहे.
शहर शिवसेनेत महापौर निवडणुकीवरून दोन गट पडले होते. एका गटाने गटनेत्या रोहिणी शेंडगे यांचे तर दुसऱ्या गटाने रिता भाकरे यांचे नाव सुचविलेले होते. सेनेतील या गटबाजीची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आली. संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी रविवारी नगरमध्ये येऊन सेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, गिरीष जाधव, आनंद लहामगे यांच्यासह सर्व नगरसेवक हजर होते. यावेळी पक्षाचे प्रमुख जो आदेश देतील त्याचे काटेकोर पालन करण्याचे ठरले. महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक सेनेचे आहेत. राज्यात महाविकास आघाडी आहे. वरिष्ठ पातळीवर सेनेचाच महापौर करण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे यावेळी कोरगावकर यांनी जाहीर केले आहे.
....
राष्ट्रवादीशी वरिष्ठ पातळीवर चर्चा
सेनेची एकजूट झाली असली तरी महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी सेनेने अद्याप चर्चा केलेली नाही. याबाबत कोरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी आहे. महापाैर निवडणुकीबाबत सेनेचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादीशी चर्चा करतील. वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन निर्णय होईल, या निर्णयाची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
...
कर्डिले यांचा वेट ॲण्ड वॉचचा सल्ला
महापाैर पदासाठी भाजपकडे उमेदवार नाही. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादीने मागीलवेळी सेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला होता. यावेळी मात्र परिस्थिती बदललेली आहे. राज्यात सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी आहे. परंतु, स्थानिक पातळीवर हे तिन्ही पक्ष एकत्र येतील का, याबाबत साशंकता आहे. सेना व राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यास भाजपचे महत्त्व वाढणार आहे. तसे झाल्यास कोणासोबत जायचे यावर भाजपमध्ये मंथन सुरू आहे. मागील आठवड्यात खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप नगरसेवकांची विळद घाटात बैठक झाली होती. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेण्याचा सल्ला कर्डिले यांनी नगरसेवकांना दिला असल्याचे समजते.
..