अस्तगाव : गेल्या ४८ वर्षांपासून निळवंडेच्या पाण्याची आतुरतेने वाट पहात असलेल्या निळवंडेच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या पाण्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचे षड्यंत्र शिर्डी-कोपरगाव जलवाहिनीच्या माध्यमातून पुढे येत आहे. पण लाभक्षेत्राबाहेर निळवंडेच्या पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही. ‘पाण्याविण्या तडफडून मरण्यापेक्षा पाण्यासाठी रस्त्यावर येऊन तीव्र संघर्ष करुन मरू,’ असा इशारा देत निळवंडे पाटपाणी कृतिसमितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.संस्थापक नानासाहेब शेळके, कार्याध्यक्ष गंगाधर गमे, अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, सचिव उत्तम घोरपडे यांनी शनिवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, जुलै २००८ पासून निळवंडे धरणात पाणी अडविले जाते. परंतु लाभक्षेत्राला पाणी मिळत नसल्याने आधीच शेतक-यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. धरणाचा मूळ उद्देश दुष्काळाशी सामना करण्या-या अवर्षणग्रस्त भागातील शेतीला शाश्वत करून या भागातील शेतक-यांचे जीवनमान उंचावणे हा आहे. केंद्रीय जल आयोगाच्या सिंचन नियोजनप्रमाणे ६८ हजार ८८७ हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन आहे. पाणी कमी व सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे प्रवाही उपसा व सूक्ष्म सिंचनाच्या सर्व पध्दतींचा वापर करुन सामाजिक न्यायासाठी जास्तीत जास्त क्षेत्राला संरक्षण देऊन पाण्याची विषमता घालविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे शेतीशिवाय पाणी वळविले गेल्यास मूळ नियोजनानुसार संरक्षित केलेल्या शेतीला पाणी देता येणार नाही. तसेच ज्या उद्देशाने धरणाची निर्मिती केली, त्यालाच हरताळ फासला जाईल, असे समितीने म्हटले आहे.
कोपरगावची टंचाई हास्यास्पद
गोदावरीच्या मुख्य खो-यातील कोपरगाव शहराला टंचाई भासणे हा प्रकार हास्यास्पद आहे. इतर वेळी कालव्याद्वारे ९ ते १० आवर्तने होत असतानाही जनतेचे पिण्याचे पाणी दारू प्रकल्पासाठी वापरले जात असल्यामुळे कोपरगावची परवड होत आहे. त्यामुळे कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी निळवंडेच्या जिरायत भागातील शेतक-यांच्या पाण्यावर डल्ला मारण्यापेक्षा दारूनिर्मितीस आवर घातल्यास कोपरगावकरांची तहान भागून कोपरगाव नगरपालिकेचे १६१ कोटी वाचू शकतात. साई संस्थानने निळवंड्यासाठी पैसे द्यायचे असतील तर विनाअट द्यावे व लोकप्रतिनिधींनी या जलवाहिनीमुळे कोणते क्षेत्र पाण्यावाचून वंचित राहणार आहे ते आधी जाहीर करावे, अशी मागणीही समितीने केली आहे.