शेवगाव : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पाथर्डी येथील सांस्कृतिक भवन येथे आढावा बैठक सुरु असतांना भाजप आमदार मोनिका राजळे आणि भाजप पदाधिकऱ्यांना आत प्रवेश नाकारल्याने प्रवेशद्वारावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे राजकीय तणाव वाढल्याचे पाहिला मिळाले. आढावा बैठकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आत प्रवेश देण्यात आला होता. मात्र यावेळी आढावा बैठकीसाठी आलेल्या सभापती सुनीता दौड, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, भाजपचे नेते पुरुषोत्तम आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, भाजप तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना आत जाण्यास पोलिसांनी रोखले असतांना आमदार मोनिका राजळे तिथे दाखल झाल्या. यावेळी प्रशासनाला जाब विचारुन आमदार राजळेंनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढा अशी मागणी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी पदाधिकाऱ्यांना आत येण्यास मुभा दिली. त्यानंतर आमदार मोनिका राजळे यांच्या समवेत आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री यांच्या समोर ठिय्या दिला. हसन मुश्रीफ यांच्या शेजारील खुर्ची आमदार राजळेंना देण्यात आली.