दहिगावने : महाआवास योजनेचा तळागाळातील सर्व घटकांना लाभ मिळावा. गोरगरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी शेवगाव पंचायत समिती सरसावली असून, विशेष नियोजन केले आहे. पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या प्रयत्नातून तालुक्यात ९३३ घरकुले मंजूर झाली आहेत.
कोणताही पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये, यासाठी गणनिहाय पालक अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. घरकुलासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली मिळावे यासाठी गुरुवारी (दि.२५) शहरटाकळी येथे राज्य शासन व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानामार्फत शिवआराधना स्वयंसहायता समूह शहरटाकळीमार्फत घरकुल मार्टचा प्रारंभ सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या हस्ते करण्यात आला.
२०२२ पर्यंत सर्वांना घरे या संकल्पनेतून ग्रामविकासमंत्री पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात महाआवास अभियान सुरू केले आहे. शंभर दिवसांच्या या अभियानातून राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना घरे देण्याचा हेतू आहे. यामध्ये जिल्हा परिषदेने कंबर कसली असून, त्याला शेवगाव पंचायत समितीने विशेष प्राधान्य दिले आहे. आपली सर्व यंत्रणा कामाला लावून चांगल्याप्रकारे नियोजन केले आहे. ज्या लाभार्थींना स्वतःची जागा आहे, त्या घरकुलांना मान्यता देण्यात आली असून, १ लाख ३८ हजार रुपयांपैकी पहिला हप्ताही त्यांच्या बँक खात्यात वर्ग केला आहे. शिवाय या अभियानात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजनांचाही समावेश करण्यात येऊन अंमलबजावणी सुरू आहे. ज्या लाभार्थ्यांना स्वतःची जागा नाही त्यांना जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी ५० हजारांपर्यंत अर्थसाहाय्यासाठी प्रस्ताव करण्यात येत आहेत. शासकीय जागा उपलब्ध करून देण्याविषयीही प्रयत्न सुरू आहेत. यासाठी गावनिहाय पालक अधिकारी जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या भेटी घेत आहेत.
----
पात्र लाभार्थ्यांना घरकुल मजूर केले आहे. पहिला हप्ता देण्यात आला आहे. मात्र जे लाभार्थी वेळेत बांधकाम पूर्ण करणार नाहीत अशा लाभार्थ्यांचे घरकुल रद्द करून पुढील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. शिवाय देण्यात आलेल्या हप्त्याची वसुली करण्यात येऊन फौजदारी व लोकआदालतमार्फत कारवाई करण्यात येईल.
-बाळासाहेब कासार,
सहाय्यक गटविकास अधिकारी, शेवगाव