चिचोंडी पाटील :
गतवर्षी चांगला पाऊस होऊनही नगर तालुक्यातील दशमीगव्हाणमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पाणी टंचाईसंदर्भात पाहणी करण्यासाठी तहसीलदार उमेश पाटील यांच्यासह संदीप गुंड, माजी सभापती प्रवीण कोकाटे, गटविकास अधिकारी धाडगे, विस्तार अधिकारी खाडे यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना शाखा प्रमुख संतोष काळे, बाजार समितीचे संचालक उद्धव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळे, अशोक काळे उपस्थित होते. यावेळी गावाला दरवर्षीच पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने या समस्यांवर कायमस्वरूपीचा तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांकडून अधिकाऱ्यांना करण्यात आली. त्याविषयी सकारात्मकता दाखवत गावच्या पाणीपुरवठ्यासाठी बुऱ्हाणनगर पाणी पुरवठा योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
सध्याची पाणी टंचाई कमी करण्यासाठी लवकरात लवकर पाण्याचा टँकर चालू करावा, अशी मागणी संतोष काळे व ग्रामस्थ यांनी केली.
--
उन्हाळ्यामुळे गावात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावाचा पाणी पुरवठा भागवता यावा, यासाठी दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपसरपंच बाबासाहेब काळे यांनी स्वखर्चातून प्रत्येक एक अशा दोन कूपनलिका खोदल्या; परंतु त्यांनाही पुरेशे पाणी न लागल्यामुळे पाणी प्रश्न कायम आहे. त्यामुळे गावासाठी टँकर सुरू होणे गरजेचे आहे.
-संगीता कांबळे,
सरपंच, दशमीगव्हाण.