आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत देण्यात येणाऱ्या खावटी कर्ज योजनेतून मंजूर झालेल्या धान्य किटचे वितरणप्रसंगी विखे बोलत होते. माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, सभापती नंदाताई तांबे, ट्रक्स सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बर्डे, प्रकल्प आधिकारी संतोष ठुबे, पंचायत समिती सदस्य संतोष ब्राह्मणे, काळू रजपूत, संचालक संजय आहेर, रेवन्नाथ जाधव, उपसरपंच गणेश विखे, अनिल विखे, प्रकल्प समन्वयक आंबादास बागुल, सहायक योगेश चोथवे उपस्थित होते.
विखे म्हणाले, राहाता तालुक्यात २ हजार ५८ आदिवासी कुटुंबीयांना खावटी कर्ज योजनेचा लाभ मिळाला आहे. तालुक्यात शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. आदिवासी समाजासाठी घरकुलांची निर्मिती हा आपला प्राधान्यक्रम असणार आहे. या समाजातील विद्यार्थी आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागतील. केंद्र सरकारने लागू केलेल्या या योजनांचा लाभ यासाठी मिळवून द्यावा लागेल. लोणी येथे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांकरिता आठ कोटी रुपयांच्या निधीतून वसतिगृह मंजूर झाले असून, लवकरच त्याची उभारणी पूर्ण होईल. याप्रसंगी प्रकल्प आधिकारी संतोष ठुबे, रेवन्नाथ जाधव, काळू रजपूत यांचेही भाषणे झाली.