यशोधन जनसंपर्क कार्यालयात रविवारी ( दि.१८) महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते घुलेवाडी येथील विविध महिला बचत गटांना संगमनेर पंचायत समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या तीन लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. आमदार डॉ.सुधीर तांबे, काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस निर्मला गुंजाळ, संगीता खांडरे, सुमन सातपुते, यमुना राऊत, उषा शेळके, गायत्री जोशी, पूनम दरेकर, मनिषा खांडरे, नंदा गावडे, आशा लुंकड, बेबी कानडे, कुसुम सातपुते, सोनाली पुरोहीत, यमुना राऊत, कमल कानवडे, सारिका खांडरे, माया वाघमारे, कावेरी रहाणे, करुणा मोकळ, नीता सातपुते, मनिषा जरे, रूपाली डावरे, अश्विनी गायकवाड उपस्थित होत्या.
थोरात म्हणाले, महिला बचत गटामुळे महिलांना आर्थिक बचतीसह व्यक्तिमत्त्व विकासासाठी मोठे व्यासपीठ मिळाले आहे. संगमनेर तालुक्यात जय हिंद महिला मंचच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन झाले आहे. या बचत गटांच्या महिलांनी विविध गृहोपयोगी वस्तू, पदार्थ बनवून त्याची विक्री करत, आपल्या कुटुंबाला मदतीचा हातभार लावला आहे. यामुळे अनेक महिलांना स्वयंरोजगार निर्माण झाला आहे. हे काम अत्यंत कौतुकास्पद असून, याची दखल राज्य पातळीवर घेतली जात आहे. या सर्व कामाबरोबर महिलांनी स्वतःच्या आरोग्याची व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.