अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरूवारपासून सुरूवात झाली. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने परीक्षा नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेने कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी विशेष दक्षता घेतली. पाथर्डीतील किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरणात परीक्षा झाली. नगर शहरात दादासाहेब रुपवते विद्यालयात कॉपी करतांना एका विद्यार्थ्याला पकडले आहे. गुरूवारी सकाळी ११ वाजता पहिला इंग्रजीचा पेपर सुरू झाला. पेपरसाठी जिल्ह्यातून ६० हजार ९०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये शहरातून ८ हजार ३५१ विद्यार्थ्यांचा समावेश होता. शिक्षण विभागाने कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्याचे आवाहन केले होते. इंग्रजीच्या पेपरसाठी शहारातील विविध केंद्रावर भरारी पथके, बैठे पथके नेमण्यात आले होते. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक कडूस यांनी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील केंद्रांना भेटी दिल्या. दरम्यान, पाथर्डी येथील प्रतिनिधीच्या माहितीनुसार येथे परीक्षेच्या काळात गोंधळ घालणाऱ्या दहा तरुणांना पोलिसांनी पकडून नंतर समज देवून सोडून दिले. पाथर्डी शहरातील ६ केंद्रावर १ हजार ९३६ परीक्षार्थी आहेत. केंद्रावर परीक्षेच्या काळात दहा तरूणांनी गोंधळ घातला होता.माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांच्या पथकाने रुपवते विद्यालयात एकाला कॉपी करतांना पकडले.या पथकाने भिंगार भागातील केंंद्रांना भेटी दिल्या. सारडा महाविद्यालय, रेसिडेन्शीअल विद्यालय, दादा चौधरी, फिरोदिया हायस्कूल येथे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत अतिशय कडकोट बंदोबस्तात परीक्षा सुरू असल्याचे दिसले. केंद्राच्या परिसरात कॉपीचा तुकडाही आढळून आला नाही. निरंतर शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे श्रीगोंदा तालुक्यात, डायटच्या प्राचार्या चंद्रकला ठोके अकोले तालुक्यात, विस्तार अधिकारी चंद्रकांत सोनार सारडा विद्यालयात तर उपशिक्षणाधिकारी दिलीप थोरे यांनी पारनेर आणि राहुरी तालुक्यात भेटी दिल्या. (प्रतिनिधी)
कॉपीमुक्तीसाठी कडेकोट सुरक्षा
By admin | Updated: February 18, 2016 23:25 IST