जरे या ३० नोव्हेंबर रोजी पुणे येथून त्यांच्या कारने नगरच्या दिशेने येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई सिंधूबाई वायकर, मुलगा कुणाल व प्रशासकीय अधिकारी विजयामाला माने या होत्या. जरे यांची कार रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात आली. यावेळी मारेकरी फिरोज राजू शेख (वय २६, रा. संक्रापूर आंबी, ता. राहुरी) व ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (वय २५, रा. कडीत फत्तेबाद, ता. श्रीरामपूर) यांनी जरे यांची कार अडवली. तुम्हाला कार व्यवस्थित चालविता येत नाही का, असे म्हणत आरोपींनी जरे यांना त्यांचे नाव विचारले. त्यानंतर जरे यांच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी मारेकरी राजू शेख, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह आदित्य सुधाकर चोळके याला अटक केली. शेख व शिंदे या दोघांना चोळके याने सुपारी दिली होती. दरम्यान, या गुन्ह्यात सागर भिंगारदिवे याचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. भिंगारदिवे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या हत्याकांडाचा सूत्रधार हा दैनिक सकाळच्या अहमदनगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक ॲड. डॉ. बाळ ज. बोठे हा असल्याचे समोर आले. चोळके याला बाळ बोठे व सागर भिंगारदिवे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचेही तपासात समोर आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. सुपारी दिल्यानंतर जरे यांचा अपघात घडवून आणण्याचा कट आरोपींनी रचला होता. त्यासाठी २४ नोव्हेंबर हा दिवस ठरला होता. जरे या कामानिमित्त पाथर्डी येथे कारने जाणार असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. रस्त्यातच जरे यांच्या कारचा अपघात घडवून आणला जाणार होता. मात्र, काही अडचणींमुळे आरोपींचा हा कट यशस्वी झाला नाही. त्यानंतर जरे यांच्या हत्येसाठी आरोपींनी ३० नोव्हेंबर हा दिवस निवडला. ३० तारखेला जरे या पुणे येथे जाणार असल्याची माहिती आरोपींना होती. बाेठे व भिंगारदिवे यांच्याकडून चोळके याला माहिती दिली जात होती, तर चोळके हा शेख, शिंदे यांच्या संपर्कात होता. ऋषिकेश वसंत पवार हाही या कटात सहभागी होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल, पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक अनिल कटके, सुपा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.
नाव विचारल्यानंतरच केला वार
मारेकरी शिंदे व शेख यांनी जरे यांची कार अडविल्यानंतर प्रथम त्यांना नाव विचारले. याच रेखा जरे आहेत, याची खात्री पटल्यानंतर आरोपीने त्यांच्या गळ्यावर हत्याराने वार केला. गाडीचा मोटारसायकला कट लागला म्हणून वाद झाला, हा आरोपींचा बनाव होता. यावेळी जरे यांच्या कारसमोर एक आरोपी उभा होता. त्याचा फोटो जरे यांच्या मुलाने कारमधून त्याच्या मोबाईलमध्ये काढला होता. याच फोटोवरून पोलीस या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचले.
घटनेचा सर्व बाजूंनी तपास
या हत्याकांडात अटक झालेले पाच आरोपी व बाळ ज. बोठे यांच्याव्यतिरिक्त आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचाही पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, बाेठे याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाच पथके रवाना केली असून, लवकरच त्याला अटक केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. हत्येच्या दिवशी व त्याआधी काही दिवसांपासून सर्व आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते. पोलिसांनी आरोपींचे हे सर्व कॉल रेकॉर्ड तपासले आहे.