पारनेर : नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेकडून युवा उमेदवारांची शोधमोहीम सुरू असून त्यातून नवीन टीम करण्यात येणार आहे. काही युवा उमेदवार निश्चित करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
नगरपंचायतचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांची मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली. प्रभागरचना होऊन प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाले. यामुळे उमेदवारी निश्चितीसाठी शिवसेनेकडून माजी आमदार विजय औटी, माजी सभापती जयश्री औटी, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, तालुकाप्रमुख विकास रोहोकले या वरिष्ठांबरोबर माजी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, शिवसेना शहरप्रमुख निलेश खोडदे, युवराज पठारे, युवा सेनेचे शुभम देशमुख, नितीन औटी, प्रवीण औटी हे शिवसेनेच्या वतीने नगरपंचायतीबाबत बैठका घेत आहेत. तसेच युवकांबरोबर संवाद साधत आहेत.
नगरपंचायतमध्ये सतरा प्रभाग असून त्यात नव्या युवकांची टीम तयार करून पक्ष बांधणीबरोबरच उमेदवारी चाचपणी करण्यात येत आहे. कोणत्या युवकांचा किती युवकांबरोबर, मतदारसंघात संपर्क आहे, याची माहिती व आढावा घेऊन उमेदवारी देण्यासाठी निश्चित केले जात आहे.
---
शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांची बैठक
पारनेर नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नियोजन सुरू करताना येत्या एक-दोन दिवसांत संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत पारनेर येथे बैठक होणार असल्याची माहिती आहे.