राहाता नगराध्यक्षपदाची निवड यंदा थेट जनतेतून केली जाणार असल्याने उमेदवारांचा कस लागणार आहे़ नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले झाल्याने अनेकांची निराशा झाली असली तरीही आपल्या सौभाग्यवतींना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा माणसही अनेकांचा आहे़ वेळ पडल्यास जातीय आरक्षणाच्या कुबड्या व गट-तट सोडून नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतण्यास सरसावलेल्यांची संख्या कमी नाही़ आता उमेदवारी कुणाला द्यावी, असा प्रश्न वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर आहे़ राहाता नगरपालिकेची सत्ता गेल्या दहा वर्षांपासून विखे पाटील गटाच्या ताब्यात आहे़ या काळात संगीता धनंजय निकाळे, कैलास सदाफळ, विद्या विजय शिंदे, लताताई मेहेत्रे, पुष्पाताई सोमवंशी यांना अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली. गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता शहरात रस्ते, वीज, पाणी असे विविध मूलभूत प्रश्न सोडविण्यात आले़ याशिवाय रुग्णालय, न्यायालय, विविध कार्यालयांच्या सुसज्ज इमारतीही थाटल्या गेल्याचा दावा सत्ताधारी करतात, तर शहराचा विकास शून्य, असा आरोप विरोधकांचा आहे़ मात्र या वेळेस नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून व सर्वसाधारण महिलाकरिता हे पद राखीव झाल्याने विखे पाटील गटातील विद्यमान नगरसेविकांसह अनेक इच्छुकांच्या नजरा नगराध्यक्षपदाकडे लागल्या आहते. वेळ पडली तर राजकीय आरक्षणाच्या कुबड्या बाजूला करून सर्वसाधारण जागेवर लढण्याचा पवित्रा इतर प्रवर्गातील इच्छूक घेतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. यामुळे उमेदवारी देताना विखे गटाचीही कसोटी लागणार आहे.
इच्छुकांच्या भाऊगर्दीने पक्षश्रेष्ठींपुढे पेच
By admin | Updated: October 7, 2016 00:49 IST