श्रीरामपूर : साईनगर दादर एक्स्प्रेसला राहुरी व श्रीगोंदा रेल्वेस्थानकावर थांबा देण्याबाबत मध्यवर्ती कार्यालयाकडे शिफारस करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेचे वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिले. सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ऑनलाईन बैठकीत हिरडे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. अध्यक्षस्थानी रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता होते.
समितीचे सदस्य रणजित श्रीगोड व विशाल फोपळे यांनी विविध सूचना केल्या. साईनगर-दादर एक्स्प्रेस आठवड्यातून चार वेळा सुरु असून तालुका स्तरावरील राहुरी व श्रीगोंदा स्थानकावर थांबा देणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रवासी जनतेला मोठी सुविधा उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.
बेलापूर स्थानकावर साप्ताहिक रेल्वेला थांबा द्यावा, शिर्डीहून राजस्थानकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी अजमेर, जोधपूर, अहमदाबाद नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे शिफारस करावी, अशी सूचनाही यावेळी श्रीगोड व फोपळे यांनी केली.
-----------