शिर्डी : साईबाबा संस्थानने श्रीराम पार्किंगमध्ये सुरू केलेल्या टाईम दर्शन काउंंटरवर रविवार २६ नोव्हेंबरला एकाच पालखीने आलेल्या १३ हजार साईभक्तांनी गर्दी केल्याने साईभक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून संस्थानने टाईम दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद करुन साईभक्तांची थेट दर्शन रांगेतून दर्शनाची व्यवस्था केली. दुपारी २.३० वाजता टाईम दर्शन व्यवस्था पुन्हा सुरळीत सुरू झाल्याचा दावा संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी केला आहे.त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुन्या साईप्रसादालयाच्या इमारतीत टाईम दर्शन व्यवस्था सुरळीत सुरू होती. त्यामुळे मात्र या जागेवर नवीन दर्शन रांगेचे काम सुरू करण्यासाठी इमारत पाडण्यात आल्याने तात्पुरत्या स्वरुपात टाईम दर्शनचे काऊंटर श्रीराम पार्किंग, साईउद्यान इमारत आदी ठिकाणी सुरू करण्यात आली. यापैकी श्रीराम पार्किंग येथे गेल्या रविवारी एका पालखीव्दारे आलेल्या १३ हजार पदयात्री भाविकांनी एकाच वेळेस टाईम दर्शन काउंटरवर गर्दी केली. त्यामुळे साईभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी डॉ.संदीप आहेर, पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे यांनी तातडीने टाईम दर्शन व्यवस्था बंद करुन सर्व भाविकांची थेट दर्शन रांगेतून दर्शनाची व्यवस्था केली. त्यानंतर दुपारी २.३० वाजेपासून टाईम दर्शन व्यवस्था पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली. साईभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिराजवळ जुन्या प्रसादालयाजवळील साईनिवास अतिथीगृहाजवळ तात्पुरती, पर्यायी टाईम दर्शन पास वितरणाचे काऊंटर तातडीने सुरू करण्याचे आदेश प्रशासनास दिल्याचे डॉ. हावरे यांनी म्हटले आहे.
साईबाबा संस्थानने टाईम दर्शन व्यवस्था पुन्हा केली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 18:39 IST