अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून पिण्यासाठी रविवारी (दि़ २२) दुपारी १२ वाजता आवर्तन सोडण्यात येणार आहे़ त्यासाठी भंडारदरा धरणातून १०० व ५० मीटर उंचीच्या टनेलद्वारे शनिवारी निळवंडे धरणात पाणी सोडले आहे. २२ ते २९ मे असे आठ दिवस हे आवर्तन चालणार असून या काळात निळवंडे धरण ते कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत दोन्ही बाजूने ५०० मीटर अंतरावर जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसेच दिवसभरातील २१ तास वीज खंडीत केली जाणार आहे.दोन्ही धरणांत मिळून १ हजार ९४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यातून मृतसाठा ४५० दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा १ हजार १९० इतका आहे. रविवारी दुपारी १२ वाजता निळवंडेतून १ हजार ७५० क्युसेक वेगाने पाणी सोडणार आहे, असे जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले़आठ ते नऊ दिवसाच्या आवर्तनात ९०० ते ९५० दशलक्ष घनफूट पाणी वापरात येण्याची शक्यता आहे. सध्या ६०० क्युसेक वेगाने भंडारदरा धरणातून १०० व ५० मीटर उंचीच्या टनेलद्वारे निळवंडे धरणात पाणी सोडण्यात आले आहे. आवर्तनकाळात पाणीचोरी रोखण्यासाठी ७ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. कारवाईचे सर्व अधिकार पथक व अभियंता यांना दिले आहेत. अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, राहुरी नेवासा आदी लाभक्षेत्रातील तलाव, बंधारे या आवर्तनातून भरून घेतले जाणार आहेत.
भंडारदऱ्यातून आवर्तन
By admin | Updated: May 22, 2016 00:18 IST