ठाणे-अहमदनगर जिल्ह्यांना जोडणारा व अकोलेकरांचा मुंबई प्रवासाचे अंतर १०० किलोमीटरने कमी करणारा हा रस्ता होणे अपेक्षित आहे. घाटघर उदंचल जलविद्युत प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. घाटघर ते चोंढे अंतर केवळ सात किलोमीटर आहे. मात्र, रस्ता नाही. सध्या घोटी इगतपुरी शहापूर असा ९० किलोमीटर वळसा मारून प्रवास करावा लागतो. रस्त्याची मागणी २० वर्षांपासून प्रलंबित आहे. २००१ मध्ये शहापूर-घाटघर, तसेच घाटघर देवीचा घाट ते शहापूर तालुक्यातील मेट(चोंढे खुर्द) असे रस्त्याचे सर्वेक्षण झाले होते. लालफितीच्या कारभारात हा रस्ता अडकला होता. या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी २०१६च्या १७व्या अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांचा विशेष निधीची तरतूदही करण्यात आली होती, परंतु हा प्रश्न प्रलंबितच आहे, तर देवीचा घाट ते चोंढे खुर्द असा रोपवे काढण्याचेही शासनाचे नियोजन होते. रविवारी आमदार डॉ.किरण लहामटे यांनी रस्ता पाहण्यासाठी पायी दौरा केला व रस्त्याच्या कामास चालना दिली.
.................
रस्ता झाल्यास विकासास चालना
घाटघर-चोंढे-डोळखांब-शेणवे शहापूर असा रस्ता झाला, तर ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांचा पर्यायाने विकास होणार आहे, तर घाटघर-देवीचा घाट-मेट(चोंढे खुर्द) असा रस्ता झाला, तर ठाणे-नाशिक -शिर्डी-अहमदनगर असे रस्ते जोडले जाऊन राष्ट्रीय इंधन, वेळ, दगदग वाचणार असून, प्रवाशांचा आर्थिक तोटाही होणार नाही. आदिवासी भागाचा आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास होण्यासाठी चालना मिळणार आहे.
( ०७ लहामटे)