अहमदनगर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला, परंतु दिवसभर निकाल पाहण्यासाठीची संकेतस्थळे हँग असल्याने विद्यार्थी व पालकांची गैरसोय झाली. सायंकाळी उशिरापर्यंत संकलित माहितीनुसार जिल्ह्यातील ९ सीबीएसई विद्यालयापैकी आर्मी पब्लिक स्कूल, संगमनेरचे ध्रुव अॅकॅडमी, सेंट मायकल स्कूल तसेच इंडस स्कूल या विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. १ ते २८ मार्च दरम्यान सीबीएसई दहावीची परीक्षा देशभर घेण्यात आली. यात नगरमधून मान्यताप्राप्त केंद्रीय विद्यालयाच्या तीन शाळा, आर्मी स्कूल, तक्षशीला, सेंट मायकल, यशश्री अॅकॅडमी, संगमनेरची ध्रुव अॅकॅडमी व इंडस स्कूल या शाळांचे विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील आर्मी पब्लिक स्कूल, संगमनेरची ध्रुव अॅकॅडमी, सेंट मायकल व इंडस स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. सेंट मायकल स्कूलमधून ३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, स्नेहा धांगुडे ९.५ ग्रेड घेत प्रथम आलीे. आर्मी पब्लिक स्कूलचे १६ विद्यार्थी टॉपर असल्याचे प्रायार्च श्रीमती काटे यांनी सांगितले, तर संगमनेरच्या ध्रुव अॅकॅडमीचे अथर्व नावंदर (९८.४० टक्के), राधिका गुजर (९८) व पूजा गांधी (९६.६ टक्के) यांनी उत्कृष्ट यश मिळवले. उर्वरित शाळांचे निकाल मिळू शकले नाहीत. निकाल पाहण्यासाठीची वेबसाईट दुपारपासूनच हँग झालेली होती. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे निकाल रात्री उशिरापर्यंत मिळाले नव्हते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून संबंधित शाळांना ई-मेलद्वारे निकाल पाठवला जातो. परंंतु तांत्रिक कारणामुळे तो मिळू शकला नाही. तसेच सर्व शाळांना सुट्या असल्यानेही निकाल मिळवण्यात अडचणी येत होत्या. (प्रतिनिधी)
चार विद्यालयांचा निकाल शंभर टक्के
By admin | Updated: May 28, 2016 23:43 IST