खर्डा : खर्डा (ता.जामखेड) येथील जिल्हा परिषदेचे विश्रामगृह दुरुस्ती, सोईसुविधांअभावी दारूड्यांचा अड्डा बनले आहे. परिसरात दारूच्या बाटल्या आढळत असून, झाडेझुडपे वाढली आहेत. सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
जिल्हा परिषदेचे जुने असलेले विश्रामगृह एकेकाळी जामखेड तालुक्यातील राजकीय व सामाजिक हालचालींचे महत्त्वाचे केंद्र होते. शिर्डी-हैदराबाद महामार्गालगत अगदी मोक्याच्या जागी साधारण एक एकरामध्ये विश्रामगृह उभारलेले आहे. २००९ साली तत्कालीन पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर यांच्या प्रयत्नातून या विश्रामगृहाची दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचरचे कामे झाले होते. मात्र, त्यानंतर त्याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे सध्या ही भव्य सरकारी वास्तू वापराविना पडून आहे. परिसरात गवत, झाडेझुडपे वाढली असून, दारूच्या मोकळ्या बाटल्या पडल्या आहेत. यामुळे परिसराला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. विश्रामगृहाच्या संरक्षण भिंतीचीही काही ठिकाणी पडझड झाली आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या असून, राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खोलींचीही पडझड झाली आहे. पूर्वी सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याची नियुक्ती होती. सध्या तिथे कोणीही कर्मचारी नसल्याने हा परिसर तळीराम, नशेबजांचा अड्डा बनला आहे.
---
तत्कालीन पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्याकडे विश्रामगृहाची इमारत ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ तत्त्वावर मागणी तीन वर्षांपूर्वी प्रस्ताव दाखल केला होता. त्यामध्ये रंगरंगोटी व विश्रामगृह सुसज्ज करण्यासाठी जिल्हा परिषदकडे निधीची मागणी केली, परंतु रस्ता रुंदीकरणामध्ये विश्रामगृहाची जागा जात असल्याने प्रस्ताव नाकारण्यात आला.
-वंदना लोखंडे,
सदस्या, जिल्हा परिषद, खर्डा
---
या विश्रामगृहाच्या जागी नव्याने ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर भव्य दोन मजली व्यापारी संकुल व तिसऱ्या मजल्यावर व विश्रामगृह बांधण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार रोहित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच त्याचा आराखडा व अंदाजपत्रक तयार होईल.
-विजयसिंह गोलेकर, जिल्हा संघटक, राष्ट्रवादी काँग्रेस
---
खर्डा येथील विश्रामगृहाच्या जागेवर ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ इमारत व विश्रामग्रह होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.
-साहेबराव कोकणे,
गटविकास अधिकारी, जामखेड
----
१५ खर्डा
खर्डा येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाच्या परिसरात पडलेला कचरा.