अहमदनगर : कोरोनाचा उद्रेक कायम असताना गृहविलगीकरणातील रुग्ण आता प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहेत. हेच कोरोनाचे संशयित आता कोरोनाचा प्रसार करीत समाजात खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. अहमदनगर शहर, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा ही शहरे हॉट
स्पॉट ठरत आहेत. या तालुक्यांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. नगर शहरात तर दिवसाला सरासरी शंभर जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर असतानाच गृहविलगीकरणात राहणारे आता प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. जिल्हा रुग्णालयात, खासगी रुग्णालयात जाणारे स्वॅब देतात आणि खुलेआम फिरतात. त्यांचा चाचणीचा अहवाल चार-पाच दिवसांनी येतो. ताप, सर्दी, थकवा जाणवल्याने चाचणीसाठी जातात. मात्र अहवाल येईपर्यंत ते घरीच थांबून असतात. त्यामुळे ते घरातील व्यक्तींच्या संपर्कात राहतात. घरातील व्यक्ती इतरांच्या संपर्कात राहतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे.
----------------
स्वॅब दिला आणि टपरीवर घेतला चहा
एका रुग्णाने जिल्हा रुग्णालयात चाचणी करून घेतली. त्यानंतर त्याने त्याच्या तीन-चार मित्रांसह जवळच्या टपरीवर चहा घेतला. गप्पा मारल्या. तो थेट घरी न जाता बँकेत गेला. तिथे पैसे काढले. त्यानंतर तो घरी गेला. जाताना चितळे रोडवर भाजीपाला, मिठाई घेतली. सदर तरुणाचा चार दिवसांनी पॉझिटिव्ह अहवाल आला. त्यामुळे त्याच्यासोबत चहा पिणारे मित्रही घाबरले. तसेच त्याच्या घरातील व्यक्तींमध्येही भीती पसरली आहे. चार दिवस तेही त्याच्या संपर्कात होते.
---------------
चाचणी केली आणि कार्यालयात काम केले
एकाला थोडा ताप आला, त्यामुळे त्याने कोणालाही न सांगता नगरमधील एका खासगी रुग्णालयात चाचणी केली. या चाचणीच्या अहवाल दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह आला. मात्र चाचणी केल्यापासून ते त्याचा अहवाल येईपर्यंत त्याने त्याच्या खासगी नोकरी असलेल्या कार्यालयात काम केले. कणकण जाणवू लागत असल्याने दुसऱ्या दिवशी तो घरीच थांबला, यावेळी तो घरातील सर्वांसोबत संपर्कात राहिला. आता अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तो घरातील एका खोलीत आहे. मात्र त्याच्या घरच्यांनाही नंतर कोरोनाची लागण झाली.
-----------
या बेजबाबदारपणाला कोण आवरणार ?
कोरोनाची लागण झालेले व घरातच विलगीकरणात राहणाऱ्यांकडून सर्व नियमांचे उल्लंघन केले जात आहे. रुग्णालयातील उपचारांना अनेकजण घाबरत आहेत, तर काहींना तेथील व्यवस्था असेल की नाही, याची शंका आहे. अनेकांचा चाचणी केल्यानंतर पाच ते आठ दिवसांनी अहवाल येतो. तोपर्यंत संबंधितांना लक्षणे नसतील तर ते बिनधास्त फिरतात किंवा घरातच राहून घरातल्या व्यक्तींशी संपर्कात राहतात. काही जण चाचणी दिल्यानंतर सकाळी फिरायला जातात, तसेच मित्रांसोबत एकत्र चहा घेतात.
----------
पूर्वी रुग्णालयात चाचणी केल्यानंतर त्याला संशयित म्हणून अहवाल येईपर्यंत रुग्णालयातच निगराणीखाली ठेवले जात होते. निगेटिव्ह आला की घरी सोडले जात होते, पॉझिटिव्ह आला की दाखल करून घेतले जात होते. तीच पद्धत सुरू करण्याचा आदेश यंत्रणेला दिला आहे. ज्यांनी चाचणी केली, त्यांच्या हातावर टेस्टिंग असा शिक्का मारण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा शिक्का बघून किमान इतर संशयितांच्या संपर्कात येणार नाहीत.
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी
--------
डमी- नेट फोटो
ट्रिटमेंट
२४ पॉझिटिव्ह रिऑलिटी चेक डमी
क्वारंटाईन
कोरोना