तिसगाव : श्री क्षेत्र मढी देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, असा ठराव मढीच्या ग्रामसभेत घेण्यात आला़ विश्वस्त मंडळाच्या कारभारावर ग्रामस्थांनी जोरदार टीका करीत आवाजी पद्धतीने विश्वस्त मंडळ बरखास्तीचा ठराव घेतला़ सरपंच भिमराज मरकड यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि़१८) ही ग्रामसभा झाली़ विश्वस्तांच्या व्यक्तिगत वादातून गावाची होणारी बदनामी, न्याय प्रविष्ठ इनामी जमिनीचे वाद, पूजा विधीमधील बदल, वाढते गैरप्रकार आदी विषयांवर ग्रामस्थांनी मंडळावर जोरदार टीका केली़ सध्याचे विश्वस्तमंडळ बरखास्त करण्यासाठी ग्रामसभेत आवाजी मतदानाने हात उंचावून ठराव घेण्यात आला़ विश्वस्त डॉ.रमाकांत मडकर यांनीही ग्रामसभेला उपस्थित राहून या ठरावाला पाठिंबा दिला. दिगंबर मरकड, एकनाथ मरकड, रामनाथ पाखरे, दिलीप पोळ, संपत मरकड, फिरोज शेख, फारुक शेख यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर साळवे, माजी सरपंच भगवान मरकड, देवस्थानचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब मरकड आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते़ न्याय प्रविष्ठ असलेल्या इनामी जमिन मोजणी, नांगरणी, महिलेची छेडछाड प्रकरण, पोलिसात दाखल तक्रारी, गुन्हे यावरुनही सभेत चांगले वाद झाले़ ऐतिहासिक साखर बारवेचे पाणी पिण्यायोग्य असतानाही तिच्या पायर्या का बुजविल्या? कानिफनाथ गड परिसरातील वाढत्या अतिक्रमणाला आळे कोण घालणार, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला़ (प्रतिनिधी) माझ्यासह इतर विश्वस्तांनी जर घटनाबाह्य कामे करुन अंमलात आणली असतील तर धर्मदाय आयुक्तांनी चौकशी करावी़ यात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि मगच विश्वस्त मंडळ बरखास्त करावे़ देवस्थानच्या कामासंदर्भात अनेक तक्रारी असून याबाबत सहायक धर्मादाय आयुक्तांची भेट घेऊन आपण चर्चा केली. यासंदर्भात ग्रामस्थ, विश्वस्त मंडळ यांची बैठक घेऊन चौकशी करावी. जो कोणी दोषी आढळला तर त्यांच्यावर कारवाई करावी व विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी यापूर्वीच केली आहे. -बाळासाहेब पवार, कोषाध्यक्ष, मढी देवस्थान. धर्मदाय कार्यालयासमोर उपोषण तीर्थक्षेत्राचे गाव असूनही दारु विक्री, इतर अवैध धंदे जोरात आहेत़ त्यामुळे दारु विक्री व अवैध धंदे बंद करण्याचा ठराव घेण्यास तरुणांनी या ग्रामसभेला भाग पाडले. येत्या पंधरा दिवसात मढी देवस्थानचे कार्यरत विश्वस्त मंडळ बरखास्तीबाबत धर्मदाय आयुक्त कार्यालयाने कार्यवाही न केल्यास अहमदनगर येथे आयुक्त कार्यालयासमोरच सामूहिक आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय ग्रामस्थांनी जाहीर केला़ नाथांची पूजा विधी परंपरा बदलून देवस्थानचे विश्वस्त मंडळ भाविकांच्या भावनेशी खेळत आहे. - लक्ष्मण महाराज मरकड साडे तीन वर्षात पाच अध्यक्ष झाले. कोषागारात प्रचंड निधी असूनही प्रत्येक मासिक सभेत विश्वस्तांची व्यक्तिगत वादांवरच जास्त चर्चा होते. त्यामुळेच विश्वस्त मंडळ बरखास्तीचा ठराव मांडला़ -मधुकर साळवे, ज्येष्ठ ग्रामस्थ विश्वस्तांच्या व्यक्तिगत हेव्यादाव्यांतून गावची सामाजिक शांतता, जातीय सलोखा यांना बाधा निर्माण होत आहे़ -भगवान मरकड, माजी सरपंच, मढी
मढी देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्तीचा ग्रामसभेत ठराव
By admin | Updated: April 10, 2024 15:38 IST