लाेकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : खासदार डॉ. सुजय विखे यांनी अहमदनगरसाठी आणलेल्या ३०० रेमडेसिविरमधून ५० इंजेक्शन्स महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी कामगार संघटना महासंघाचे कॉ. भैरवनाथ वाकळे व डॉ. मेहबूब सय्यद यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कामगार संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेचे दोन कर्मचारी कोरोनामुळे गंभीर आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे हे रेमडेसिविर मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही फोन केला. परंतु, महापालिका व जिल्हा प्रशासनच हतबल असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना इंजेक्शन मिळू शकत नाही, ही बाब निषेधार्ह आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी थेट दिल्लीवरून ३०० इंजेक्शन्स आणलेले आहेत. त्यापैकी ५० इंजेक्शन्स आपल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी महापालिकेने करावी. तसे पत्र आयुक्त या नात्याने आपण खासदार विखे यांना द्यावे, अशी मागणी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.