नेवासा : सोनई (ता. नेवासा) येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या मुळा रूरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या डी फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता प्रवेश सुविधा केंद्राला तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांची मान्यता मिळाली आहे. यामुळे सोनई परिसरातील ग्रामीण भागातील डी. फार्मसी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची व पालकांची धावपळ कमी होऊन सोनईमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती मुळा एज्युकेशन संस्थेचे सहसचिव डॉ व्ही. के. देशमुख यांनी दिली.
महाविद्यालयाच्या या सुविधा केंद्रात अद्ययावत संगणक कक्षात विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधा व प्रवेश प्रक्रियेसंदर्भाची प्रक्रिया राबविण्यात येईल. केंद्रीभूत प्रवेश निश्चितीसाठी ऑनलाइन अर्ज भरून कागदपत्रांची तपासणी करणे, छाननी करणे, ऑप्शन फॉर्म भरणे ही कामे या सुविधा केंद्रामार्फत मोफत करण्यात येतील. सोनईमध्ये डी फार्मसी अभ्यासक्रमाची दोन महाविद्यालये असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता १२० जागांची आहे.
(वा. प्र.)