अहमदनगर : वर्षभरातच राष्ट्रीय जनमंच पक्षाने नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जोडले असून, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राधाकृष्ण बाचकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय जनमंच (सेक्युलर) पक्षाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिर्डी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कैलास कोळसे, प्रदेशाध्यक्ष अविनाश झेंडे, उपाध्यक्ष बाळासाहेब गिधाड, प्रदेश महासचिव भगवानराव जर्हाड, प्रदेश कोषाध्यक्ष प्रकाश थोरात, सचिव संदीप लांडगे, युवक प्रदेशाध्यक्ष सचिन देशमुख आदी उपस्थित होते.
बाचकर म्हणाले, राष्ट्रीय जनमंच पक्ष हा महाराष्ट्रासह बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आदी राज्यांत विस्तारला आहे. या राज्याचे प्रभारीसुद्धा नियुक्त करण्यात आले आहेत. यावेळी पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. कार्यक्रमात कैलास कोळसे, प्रकाश थोरात, प्रतापराव पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, नितीन थोरात, साहेबराव रासकर, विजय कुटे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रदेश महासचिव भगवानराव जऱ्हाड यांनी केले. युवक प्रदेशाध्यक्ष सचिन देशमुख यांनी आभार मानले.